भारतीय रेल्वेच्या रेल कोच फॅक्टरीने व्हेंटिलेटरचा प्रोटोटाइप तयार केला आहे. कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरीमध्ये व्हेंटिलेटरचा प्रोटोटाइप म्हणजे प्रतिकृती बनवण्यात आली आहे. रेल्वेने ट्रेनचे डबे क्वारंटाइन सेंटरमध्ये बदलले आहेत. तिथे या व्हेंटिलेटरचा उपयोग करण्याची योजना आहे.

व्हेंटिलेटर बनवण्याचा प्रयत्न करा, असे निर्देश सरकारकडून मिळाल्यानंतर आठवडयाभराच्या आता रेल्वेने या व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. सध्या उपलब्ध व्हेंटिलेटरची जी किंमत आहे, त्यापेक्षा या व्हेंटिलेटरची किंमत खूपच कमी असेल.

रेल्वेने बनवलेल्या व्हेंटिलेटरच्या प्रोटोटाइपला ‘जीवन’ नाव देण्यात आले आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च म्हणजे आयसीएमआर या व्हेंटिलेटरची अंतिम चाचणी करणार आहे. चाचणी यशस्वी ठरली आणि ICMR कडून मान्यता मिळाली तर रेल्वेशी संबंधित देशभरातील विभागांमध्ये ‘जीवन’ची निर्मिती सुरु होईल.

रेल कोच फॅक्टरीतील वैद्यकीय तज्ज्ञांनी या प्रोटोटाइपची चाचणी घेतली असून, त्यांनी आपली मंजुरी दिली आहे. आरसीएफचे महाव्यवस्थापक रविंदर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० हजार रुपयांपेक्षा या व्हेंटिलेटरची किंमत कमी असेल.

या व्हेंटिलेटरमध्ये कॉम्प्रेसर नाहीय. इमर्जन्सीमध्ये या व्हेंटिलेटरचा वापर करता येईल. याचे उत्पादन करणे अत्यंत सोपे आहे. अत्यंत छोटया आकाराचे भाग वापरुन हे व्हेंटिलेटर बनवता येतात असे रविंदर गुप्ता म्हणाले. ट्रेनचा डब्बा बनवण्यासाठी लागणारे भाग वापरुन हे व्हेंटिलेटर तयार केले आहेत. भारतीय रेल्वेचे इंजिनिअर्स, प्लांट डिझायनर्स आणि आरसीएफ हॉस्पिटलमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी मिळून या व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे.