रेल्वेत लोअर बर्थवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी थोडी धक्कादायक बातमी आहे. रेल्वेने लागू केलेल्या नव्या नियमांमुळे लोअर बर्थवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या झोपेच्या वेळेवर परिणाम होणार आहे. शयनयान किंवा तृतीय एसीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. या श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री १० ते सकाळी सहा या वेळेतच त्यांच्या जागेचा वापर झोपण्यासाठी करता येणार आहे. रेल्वेने नव्याने लागू केलेल्या नियमावलीमध्ये हा बदल करण्यात आला आहे.

रेल्वेतील लोअर बर्थ हे सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीमध्ये केवळ बसण्यासाठी वापरावेत, असे नव्या नियमांमध्ये म्हटले आहे. या पूर्वी लोअर बर्थची जागा सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत बसण्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. पण आता रात्री नऊऐवजी दहा वाजेपर्यंत लोअर बर्थची जागा बसण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. यामुळे लोअर बर्थवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अप्पर बर्थपेक्षा एक तास कमी झोपता येणार आहे. नियमांमध्ये हा बदल करतानाच रेल्वेने प्रवाशांना एक आवाहनही केले आहे. जर रेल्वेतून गर्भवती, वयोवृद्ध व्यक्ती, दिव्यांग किंवा आजारी व्यक्ती प्रवास करीत असेल तर सहप्रवाशांनी त्यांना जास्त वेळ झोपू द्यावे. त्यांना या नियमांच्या चौकटीत अडकवू नये, असेही रेल्वेने म्हटले आहे.

दरम्यान, दिव्यांग प्रवाशांना रेल्वेत प्राधान्याने लोअर बर्थ देण्यासाठी नव्या सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येते आहे. त्यामुळे तृतीय एसीमधून प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांनाही लवकरच लोअर बर्थ प्राधान्याने उपलब्ध करून दिले जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.