धावत्या लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये प्रवाशांना मसाज सेवा उपलब्ध करुन अतिरिक्त आर्थिक उत्पन्न कमावण्याची भारतीय रेल्वेची सेवा सुरू होण्याआधीच बंद झाली आहे. या योजनेचा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने ट्विटरद्वारे दिली आहे. माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि भाजपा खासदार शंकर लालवानी यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना लिहिलेल्या पत्रांनंतर ही सेवा बंद करण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे.  याशिवाय मसाज सुरू असताना महिलांना त्याठिकाणी वावरणं किंवा तेथेच बसून प्रवास करणं सोयीस्कर नसेन अशाप्रकारचेही काही प्रश्नही उपस्थित केले जात होते.

सुमित्रा महाजन आणि लालवानी यांनी पत्राद्वारे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि प्रवासादरम्यानच मसाज सेवा केली जाणार असल्याने महिलांच्या सोयीसाठी वेगळी कोणती व्यवस्था करणार अशाप्रकारचे काही प्रश्न उपस्थित केले होते. पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी, रेल्वे प्रवासी आणि इतर अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या सकारात्मक सुचनांचा सन्मान करत असून इंदोर येथून धावणाऱ्या 39 गाड्यांमध्ये मसाज सेवेचा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याचं जाहीर केलं आहे.

माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बहुचर्चित मसाज सेवेबाबत शुक्रवारी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांना शुक्रवारी पत्र लिहिलं होतं. अशाप्रकारच्या सेवेसाठी ट्रेनमध्ये कोणत्याप्रकारची व्यवस्था केली जाईल, यामुळे प्रवाशांना विशेषतः महिला प्रवाशांना त्रास होऊ शकतो, अशा आशयाचं पत्र महाजन यांनी लिहिलं होतं. यापूर्वी भाजपाचे नवनिर्वाचित खासदार शंकर लालवानी यांनीही मसाज सेवेबाबत रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.  रेल्वेत मसाज सुविधा अनावश्यक असून अनेक महिला संघटनांनी याविरोधात आपल्याकडे तक्रारी केल्याचे लालवानी म्हणाले होते.

ही सुविधा रात्री दहा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत दिली जाणार होती. यासाठी 15 मिनिटांच्या मालिशसाठी प्रवाशांना 100 रुपये खर्च, क्रीमचा वापर केला असता 15 ते 20 मिनिटांच्या डायमंड मसाजसाठी 200 रुपये खर्च, आणि प्लॅटिनम मसाजसाठी 300 रुपये खर्च येईल असं सांगण्यात आलं होतं.