आंतरराष्‍ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. शुक्रवारी सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर ७१ रुपयांच्या नीचांकी स्तरावर आला. सकाळच्या घसरणीनंतर काही वेळानंतर रुपयामध्ये सुधारणा झाली. पण गुरूवारच्या तुलनेत आज शुक्रवारी रुपया १७ पैशांनी घसरला. गुरूवारी एका डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत ७०.७४ होती. शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यानंतर रूपयाची किंमत ७०.९६ वर पोहचली. काही वेळानंतर घसरण थांबली मात्र नीचांकी स्तर कायम आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया ७०.९१ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

महिनाअखेर बाजारात डॉलरची वाढती मागणी आणि कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारातून पैसे काढण्यास सुरूवात केल्याचा फटका रूपयाला बसला. गुरूवारी १५ पैशांची घसरण झाल्यानंतर रूपया ७०.७४ रूपयांवर बंद झाला होता. पण आज बाजार सुरू होताच रूपयात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली.

आंतरराष्ट्रीय बाजापपेठेमध्ये डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. भारत ८० टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सतत वाढ होतेय तर डॉलरच्या तुलनेत रूपयाची सतत घसरण होत असल्यामुळे तेल कंपन्यांना जास्त दराने कच्चे तेल आयात करावे लागत आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयाने वाढ झाली आहे. आज शुक्रवारी मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर दर ८५.९३ रुपये दर तर डिझेलचा प्रतिलिटर दर ७४.५४ रुपये झाला आहे.