News Flash

झोपेचे तालचक्र उलगडण्यात भारतीय वैज्ञानिकास यश

माणूस रात्री झोपतो व सकाळी जागा होतो हे चक्र गेली लाखो वर्षे माणसामध्ये चालू आहे, पण त्याचे नियंत्रण नेमके कसे होते याचा उलगडा भारतीय वंशाच्या

| August 19, 2015 02:58 am

माणूस रात्री झोपतो व सकाळी जागा होतो हे चक्र गेली लाखो वर्षे माणसामध्ये चालू आहे, पण त्याचे नियंत्रण नेमके कसे होते याचा उलगडा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाने केला आहे. अमेरिकेतील इलिनॉईस राज्यातील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक व सिरकारडियन तालचक्राचे तज्ज्ञ रवी अल्लादा यांनी प्राण्यांमध्ये झोपेचे चक्र कसे चालते याचा शोध घेतला आहे.
रात्री झोप व दिवसा जाग येणे यात मेंदूतील काही न्यूरॉन्स कार्यान्वित होतात असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे संशोधन ‘सेल’ (पेशी)  या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या मते झोपेचे चक्र हे जैविक कळींवर (बटने) चालू असते. मेंदूच्या संशोधनात न्यूरॉन्सला महत्त्व असते व झोपही मेंदूशीच निगडित असते. जेव्हा सकाळ होते अथवा दिवस असतो तेव्हा सोडियम मार्गिका जास्त कार्यान्वित असतात त्यामुळे संबंधित पेशी म्हणजे न्यूरॉन्स चालू होऊन आपण जागे होतो किंवा राहतो. पोटॅशियमच्या मार्गिका रात्री जास्त क्रियाशील होतात तेव्हा आपल्याला झोप येते. झोपेची ही चालू-बंद कळ संशोधकांनी माशा व उंदीर यांच्यात शोधून काढली आहे. अल्लादा यांच्या मते आपल्या झोपेच्या चक्राचे नियंत्रण हे प्राचीन काळापासून याच पद्धतीने होत आहे. उंदरासारख्या सस्तन प्राण्यांवर केलेले हे संशोधन माणसाच्या बाबतीत खरे आहे यात शंका नाही. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर हे झोपेचे चक्र विकसित झालेले आहे, असे वेनबर्ग कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स या महाविद्यालयातील मेंदूविज्ञानाच्या अध्यासनाचे प्रमुख अल्लादा यांनी सांगितले. झोपेचे चक्र व्यवस्थित समजले तर जेट लॅग, दिवस-पाळी-रात्र पाळी यामुळे झोपेच्या बिघडणाऱ्या चक्रावर नवीन औषध शोधता येईल. माणसाच्या झोपेचे चक्र त्याला सोयीनुसार बदलता येऊ शकते अशी आशा त्यामुळे निर्माण झाली आहे. २४ तासांत कालचक्राची माहिती न्यूरॉन्सपर्यंत पोहोचत असते व सायकलचे एक पॅडल वर तर एक खाली असते त्याप्रमाणे ही व्यवस्था असते. सोडियमचा प्रवाह व पोटॅशियचा प्रवाह ही दोन पॅडल्स येथे असतात. फळमाशी व उंदीर यांच्यावरील संशोधनात निघालेले हे निष्कर्ष थक्क करणारे आहेत. ज्या फळमाशांमध्ये जनुकीय उत्परिवर्तन असते त्यांच्यात सोडियम मार्गिका बिघडलेली असते त्यामुळे झोपेचे चक्र बिघडते. हे सगळे कोडे उलगडण्यास अजून वेळ लागेल पण एक महत्त्वाचा धागा हाती लागला आहे. जनुकशास्त्र, वर्तनशास्त्र, न्यूरॉन्सच्या क्रियाशीलतेचे विद्युत मापन अशा अनेक पद्धतीने झोपेच्या चक्राचा अभ्यास करता येईल असे अल्लादा यांचे म्हणणे आहे. झोपेचे नियंत्रण करणाऱ्या मार्गिका सापडल्या पण या मार्गिकांचे नियंत्रण कसे होते हा प्रश्न अनुत्तरित आहे. आता त्या दिशेने संशोधन होणे गरजेचे आहे असे अल्लादा यांचे मत आहे.

झोपेचे तालचक्र
’ लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत विकसित
’ सोडियमच्या मार्गिकेमुळे जागे होण्याचा संदेश
’ पोटॅशियम मार्गिकेमुळे रात्री झोपण्याचा संदेश
’ या मार्गिका कशा नियंत्रित होतात हे अनुत्तरित
’ जेट लॅग, झोपेच्या समस्यांवर औषध शक्य

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 2:58 am

Web Title: indian scientist discover gene that controls sleep
टॅग : Sleep
Next Stories
1 रक्ताच्या गुठळ्या एकाच चाचणीत शोधण्याचे तंत्र विकसित
2 माजी अध्यक्ष राजपक्षे यांना पराभव मान्य
3 अतिरेकी नावेदची ‘लाय डिटेक्टर’ चाचणी
Just Now!
X