पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्य़ात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान हुतात्मा झाला. त्यामुळे या महिन्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांची संख्या चार झाली आहे.

पाकिस्तानी लष्कर व रेंजर्स यांनी पूंछ जिल्ह्य़ात कृष्णा घाटीनजीक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. कथुआ जिल्ह्य़ात हिरानगर येथे आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवरही गोळीबार करण्यात आला. त्याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पाकिस्तानी सैन्याने नंतर राजौरी क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर बेछूट गोळीबार केला. त्यात हवालदार दीपक कार्की गंभीर जखमी झाले नंतर त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती लष्कराचे जनसंपर्क अधिकारी देवेंदर आनंद यांनी दिली. पाकिस्तानचे काही सैनिक मारले गेले किंवा नाही हे समजू शकले नाही. हवालदार कार्की हे शूर व देशभक्तीने प्रेरित होते. देश त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही, असे आनंद यांनी म्हटले आहे.

गेल्या महिनांभरात पाकिस्तानने राजौरी व पूंछ भागात अनेकदा गोळीबार केला असून आतापर्यंत चार भारतीय सैनिक त्यात धारातीर्थी पडले आहेत. पाकिस्तानच्या गोळीबारात ४ व १० जून रोजी राजौरी जिल्ह्य़ात दोन भारतीय सैनिक मारले गेले होते. पूंछ येथे सीमावर्ती भागातील गोळीबारात १४ जूनला एका भारतीय सैनिकास वीरमरण आले होते. पाकिस्तानने जम्मू-काश्मीर सीमेवर गोळीबार वाढवला असून जम्मू-काश्मीरमध्ये १० जूनपर्यंत २०२७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. पाकिस्तानी  लष्कराने कृष्णाघाटी भागातही गोळीबार केला आहे. पहाटे ३.३० वाजता पाक लष्कराने बेछूट गोळीबार केला, त्यात तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला होता. दोन्ही देशांदरम्यान जोरदार गोळीबार सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानने जम्मू-काश्मीर सीमेवर गोळीबार वाढवला असून जम्मू-काश्मीरमध्ये १० जूनपर्यंत २०२७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. पाकिस्तानी  लष्कराने कृष्णाघाटी भागातही गोळीबार केला आहे.