25 September 2020

News Flash

सर्जिकल स्ट्राइकसाठी १९ जवानांनी १० दिवस पाहिली अमावस्येची वाट

शौर्य पुरस्कारासोबत मिळालेल्या प्रशस्तीपत्रकातून खुलासा

प्रातिनिधिक छायाचित्र

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सर्जिकल स्ट्राइकमध्ये यशस्वी करणाऱ्या १९ जवानांना २६ जानेवारीला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र यामधील कोणाचीही माहिती देण्यात आली नव्हती. टाईम्स ऑफ इंडियाने सर्जिकल स्ट्राइकबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या पथकामध्ये एक कर्नल, पाच मेजर, दोन कॅप्टन, एक सुभेदार, दोन नायब सुभेदार, तीन हवालदार, एक लान्स नायक आणि चार पॅराट्रॉपर्सचा समावेश होता. हे सर्व जवान पॅरा रेजिमेंटच्या चौथ्या आणि नवव्या बटालियनचे होते. यामधील मेजर रोहित सूरी यांचा किर्ती चक्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यासोबतच सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या कर्नल हरप्रीत संधू यांचा युद्ध सेवा पुरस्कार आणि त्यांच्या पथकाला चार शौर्य पुरस्कारांसह १३ सेवा पदकांनी गौरवण्यात आले.

सर्जिकल स्ट्राइक दरम्यान कर्नल हरप्रीत संधू यांनी दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅडवर दोनवेळा हल्ले केले. शत्रूच्या लॉन्च पॅडचा अचूक वेध घेणाऱ्या हरप्रीत यांचा युद्ध सेवा पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे भारतीय सैन्याने उरी हल्ल्यानंतर लगेचच सर्जिकल स्ट्राइकची तयारी केली होती. मात्र सर्जिकल स्ट्राइक करणारे पथक अमावस्येच्या रात्रीची वाट पाहात होते. त्यामुळेच २८-२९ सप्टेंबरच्या रात्री सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले.

सर्जिकल स्ट्राइकआधी भारतीय सैन्याकडून रेकी करण्यात आली होती. यानंतर सर्जिकल स्ट्राइकला सुरुवात होताच मेजर सूरी यांनी त्यांच्या टिमच्या मदतीने लॉन्च पॅडजवळ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर दुसऱया मेजरने लॉन्च पॅडवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पार पाडली. सहकाऱ्यांकडून साधले जाणारे लक्ष्य आणि सहकाऱ्यांच्या आसपासचा परिसर यांच्यावर दुसऱ्या मेजरने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले होते. यासोबतच शत्रूच्या लॉन्च पॅडवर आणखी कोणत्या मार्गांनी हल्ले करता येतील, यावर दुसऱ्या मेजरचे लक्ष होते. यावेळी तिसऱ्या मेजरने जवानांच्या मदतीने दहशतवादी लपत असलेल्या जागा उद्ध्वस्त केल्या. यासोबतच झोपलेल्या दहशतवाद्यांनादेखील जवानांनी कंठस्नान घातले.

चौथ्या मेजरने ग्रेनेडच्या मदतीने दहशतवाद्यांच्या सर्व स्वयंचलित शस्त्रास्त्रांना लक्ष्य केले. तर पाचव्या मेजरने इतर मेजर आणि त्यांच्या साथीदारांवर नजर ठेवण्याची जबाबादारी पार पाडली. चौथ्या मेजरच्या टिमवर तीन दहशतवाद्यांनी ग्रेनेड्सच्या मदतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाचव्या मेजरने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जखडून ठेवले. या संपूर्ण ऑपरेशन दरम्यान भारताचा एकही जवान शहीद झाला नाही. या कारवाईदरम्यान एक पॅराट्रॉपर जखमी झाला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रकातून जवानांनी पार पडलेली कामगिरी समोर आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 9:13 pm

Web Title: indian soldiers did surgical strike tells in commendation cards waits for amavasya
Next Stories
1 गुजरातची अवस्था उत्तर प्रदेश, बिहारपेक्षाही भयानक: हायकोर्ट
2 रोखीच्या व्यवहारांमुळे करचोरी, भ्रष्टाचारात वाढ: अरुण जेटली
3 बीएसएफचा जवान तेजबहादूर बेपत्ता झाल्याचा दावा, पत्नीची कोर्टात धाव
Just Now!
X