पहिल्या महायुद्धातील योगदानाबद्दल लॅव्हेन्टी शहरातील पहिल्या स्मृतिस्थळाचे अनावरण

पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीच्या स्मृतिप्रीत्यर्थ फ्रान्समधील लॅव्हेन्टी या शहरात नव्याने उभारलेल्या पुतळ्याचे अनावरण रविवारी, सैन्य दिनानिमित्त झाले. १९१८ मध्ये पहिले महायुद्ध संपल्याच्या स्मरणार्थ हा दिन पाळला जातो.

ब्रिटिश सैन्यातून लढताना हौतात्म्य आलेल्या भारतीय सैनिकांना फ्रान्समधील वेगवेगळ्या स्मशानभूमींमध्ये दफन केलेले आहे. या ठिकाणांजवळ अशी ५७ स्मृतिस्थळे उभारण्याची योजना ‘इंटर फेथ शहिदी कोमेमोरेशन असोसिएशन’ (आयएफएससी) या संस्थेने आखली आहे. त्यापैकी हा सात फुटी कांस्य पुतळा पहिलेच स्मारक आहे. लॅव्हेन्टी येथील दोन मृतावशेष हे ३९ व्या रॉयल गढवाल रायफल्सच्या जवानांचे असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांचे गेल्या वर्षी पुन्हा लष्करी इतमामात दफन करण्यात आले होते.

फ्रान्सच्या भूमीत चिरनिद्रा घेत असलेल्या आपल्या भारतीय सैनिकांचे अशा सर्व ५७ ठिकाणी पुतळे उभारण्याच्या प्रकल्पाला आम्ही लॅव्हेन्टीतून आरंभ केला आहे.      – कर्नल (निवृत्त) दीपक दहिया, उपाध्यक्ष, आयएफएससी