News Flash

२०२० मध्ये इस्रोची ‘गगन’भरारी, चांद्रयान-३ साठी केंद्र सरकारची परवानगी

इस्त्रो २०२० मध्ये गगनयान आणि चांद्रयान-३ मोहीम लॉन्च करणार आहे

इस्त्रो २०२० मध्ये गगनयान आणि चांद्रयान-३ मोहीम लॉन्च करणार आहे. इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच देशवासियांना आनंदाची बातमी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी इस्रोची पुढील मोहीम आणि योजनांची माहिती दिली. चांद्रयान-३ मोहिमेसाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली असल्याचं के सिवन यांनी सांगितलं आहे. तसंच गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत. अवकाश विज्ञानाच्या सहाय्याने आम्ही देशवासियांचं जीवनमान अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करत असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं.

गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड
“२०२० मध्ये आम्ही चांद्रयान-३ लॉन्च करणार आहोत. गगनयानच्या अंतराळवीरांना जानेवारीच्या महिन्याच्या तिसऱ्या महिन्यापासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली जाणार आहे. गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर सल्ला समितीचं गठन करण्यात आलं आहे. २०१९ मध्ये गगनयान मोहिमेत आम्ही चांगली प्रगती केली आहे,” अशी माहिती के सिवन यांनी दिली आहे.

चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ मध्ये साम्य
चांद्रयान-३ बद्दल बोलताना के सिवन यांनी माहिती दिली की, “चांद्रयान-३ मोहीम याचवर्षी लॉन्च केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे. चांद्रयान-३ मोहीमेत आणि चांद्रयान-२ मध्ये बरंच साम्य आहे. मोहिमेवर काम सुरु झालं आहे. याचं कॉन्फिगरेशन चांद्रयान-२ प्रमाणेच असेल. यातही लँडर आणि रोव्हर असणार आहे”.

चांद्रयान-२ चा ऑर्बिटर सक्रिय
भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेची फक्त भारतात नाही तर जगभरात चर्चा झाली होती. जगाने भारताच्या या ऐतिहासिक मोहिमेची दखल घेतली होती. भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चांद्रयान-२ मोहीम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली होती. चंद्रापासून २.१ कि.मी. उंचीवर असतानाच अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. यासंबंधी बोलताना के सिवन यांनी सांगितलं की, “आम्ही यशस्वीपणे लँडिंग करु शकलो नसतो तरी ऑर्बिटर अद्यापही काम करत आहे. पुढील सात वर्ष हा ऑर्बिटर सक्रिय राहणार असून यामधून वैज्ञानिकांसाठी महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल”.

तुतुकुडीमध्ये उभं राहणारं देशातील दुसरं स्पेस पोर्ट
के सिवन यांनी देशात उभ्या राहणाऱ्या दुसऱ्या स्पेस पोर्टबद्दलही यावेळी माहिती दिली. “स्पेस पोर्टसाठी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे स्पेस पोर्ट तामिळनाडू येथील तुतुकुडी येथे उभारण्यात येणार आहे. आगामी काळात इस्रो मंगळ ग्रहापासून ते शनी ग्रहापर्यंत अनेक महत्त्वाच्या मोहीमांवर काम करणार आहे. गगनयान मोहिमेसाठी इस्रो रशियाची मदत घेणार आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 12:23 pm

Web Title: indian space research organisation isro k sivan chandrayan 3 gaganyan sgy 87
Next Stories
1 अभिनेत्रीने पतीसमोरच केली एक्स बॉयफ्रेंडची हत्या
2 देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही : नरवणे
3 सत्तेत असणाऱ्या सरकारच्या आदेशानुसार काम करावं लागतं – बिपिन रावत
Just Now!
X