करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीनमधील वुहान शहरात जाहीर करण्यात आलेला ११ आठवड्यांचा लॉकडाउन आता उठवण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या सर्वांमध्येच आनंदाचं वातावरण आहे. याचदरम्यान चीनमध्ये राहत असलेल्या काही भारतीयांनी भारतातील नागरिकांना मोलाचा संदेश दिला आहे. करोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सर्वांवर असलेल्या धोका आता टळल्यामुळे लोकांमध्ये आनंदाचं वातावरणही दिसून येत आहे.

“७३ दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी मी केवळ माझ्या खोलीतच थांबलो होतो. गेले अनेक दिवस मी कोणाशीही बोललोच नसल्यानं मला आता मला आता नीट बोलताही येत नाहीये. यादरम्यान केवळ परवानगी घेऊन मी माझ्या प्रयोगशाळेत जात होतो,” अशी माहिती वुहानमध्ये हायड्रोबायोलॉजिस्ट म्हणून कार्यरत असणारे अरूणजीत टी सार्थजीत यांनी दिली. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी भारतानं दोन एअर इंडियाची विषेश विमानं पाठवली होती. त्या विमानांमधून तब्बल ७०० भारतीयांना मायदेशी आणण्यात आलं. यादरम्यान अरूणजीत यांनी भारतात न परतण्याचा निर्णय घेतला. संकटकाळातून पळून जाणं हा भारतीयापुढील पर्याय नसल्याचं त्यांनी सांगितलं.

चीनमधील हुबेई प्रांतात आतापर्यंत करोनाचे ६७ हजार ८०३ रूग्ण सापडले आहेत. यापैकी ५० हजार ८ रूग्ण हे या प्रांताची राजधानी वुहानमधील आहेत. ज्या भारतीयांना संकटकाळात परत न येण्याचा निर्णय घेतला त्यांच्यापैकीच अरूणजीत हे एक आहेत. मायक्रोबायोलॉजिस्ट पासून हायड्रोबायोलॉजिस्ट पर्यंत प्रगती केलेले अरूणजीत हे त्या ठिकाणी सुरू असलेल्या संशोधनाच्या टीमचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

मान्सूनदरम्यान समस्या
“भारतानं संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य आहे. परंतु मान्सूनदरम्यान मोठ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. त्या दरम्यान लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यावेळी हा व्हायरस लोकांसाठी घातक ठरू शकतो,” असं अरूणजीत म्हणाले. लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंग हे वुहानकडून शिकण्यासारखं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

त्या ठिकाणी कार्यरत असलेले एक वैज्ञानिकही अरूणजीत यांच्या मताशी सहमत आहेत. “मी ७२ दिवस स्वत:ला घरात बंद करून ठेवलं होतं. माझ्या शेजारी राहणाऱ्यांची तीन लहान मुलं आहेत. परंतु लॉकडाउन दरम्यान, त्या तिन्ही लहान मुलांना मी एकदाही घराच्या बाहेर पडलेलं पाहिलं नाही,” असं त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. “भारतातही लॉकडाउनचं पालन झालं पाहिजे. मी या धोक्यातून बचावलो याचा मला आनंद आहे. परंतु आताही मला बाहेर पडण्यास भीती वाटते. करोनाची लागण झालेल्या कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकेन याची भीती अजूनही मनात आहे,” असंही त्यांनी सांगितलं.