अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतातील क्रॅटर तलावात बुडून एका २७ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सुमेध मन्नार असे मृत तरुणाचे नाव आहे. तलावाजवळ फिरायला येणाऱ्या पर्यटकांमध्ये “जम्पिंग रॉक” लोकप्रिय आहे. सुमेधने रविवारी संध्याकाळी ४.४०च्या सुमारास “जम्पिंग रॉक”वरुन तलावात उडी मारली. पण त्यानंतर तो वरती आलाच नाही अशी माहिती क्रॅटर लेक नॅशनल पार्कच्या महिला प्रवक्त्याने दिली.

ओरेगॉन विद्यापीठात सुमेध पदवीचे शिक्षण घेत होता. २५ फूट उंचीवरुन त्याने तलावात उडी मारली. “जम्पिंग रॉक” ज्या कडयावर आहे तिथे सर्वांना प्रवेश आहे. सुमेध कशामुळे बुडाला ते अजून अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले नाही. या तलावाचे सरासरी तापमान तीन डिग्री सेल्सिअस असते. पण उन्हाळ्यात १५ डिग्री पर्यंत तापमान असते.

सुमेध मन्नार वर आला नाही. तेव्हा तिथे असणाऱ्या नागरीकांनी आपल्यापरीने शोधकार्य सुरु केले. नॅशनल पार्कने त्यांच्याकडे असलेल्या बोटीने शोध सुरु केला. पण दृश्यमानता कमी असल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. तीन तासाच्या शोधानंतरही मन्नार सापडला नाही. रात्र झाल्याने नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांनी शोध थांबवला व दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी शोध सुरु केला. पाणबुड्यांना ९० फूट खोल सुमेध मन्नारचा मृतदेह सापडला.