भारतीय वंशाचा विद्यार्थी असनीश कल्याणसुंदरम हा ब्रिटनमधील सर्वात हुशार विद्यार्थी ठरला असून, त्याने महत्त्वाच्या पाचही विषयांत १०० टक्के गुण मिळाले आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व टीकात्मक विचार या सर्व पाच विषयांत त्याला अ श्रेणी मिळाली आहे. तो अठरा वर्षांचा असून या यशाने आनंदून गेला आहे. आता तो केंब्रिज विद्यापीठात ऑक्टोबरपासून वैद्यक शाखेत अभ्यास सुरू करणार आहे. त्याला शल्यविशारद व्हायचे असून त्याने वैद्यकशास्त्रातील शाखा मात्र अजून ठरवलेली नाही. तो त्याची आई सुजाता हिच्यासमवेत बर्नले, लँकेशायर येथे राहतो. तो बॅडमिंटन खेळाडू असून सेंट जोसेफ पार्क हिल स्कूल व बॅकप अँड रॉटेनस्टॉल ग्रॅमर स्कूल येथे त्याचे शिक्षण झाले आहे, असे बर्नले एक्सप्रेसने म्हटले आहे. शाळेच्या प्रवक्त्याने सांगितले, की असनीशने वेगळे यश मिळवले असून त्याने संधीचे सोने केले आहे. असनीश याला न्यूफील्ड फाऊंडेशनच्या १०० तासांच्या प्रकल्पात व सादरीकरणातही अ श्रेणी मिळाली आहे. त्याला अलीकडेच डय़ुक ऑफ एडिंबर्गचा सुवर्ण पुरस्कार मिळाला होता. लंडन येथे सेंट जेम्स राजप्रासादात त्याला राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलीप यांनी तो प्रदान केला होता.