उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा कल आता ऑस्ट्रेलियाकडे वाढत चालला आहे. ऑस्ट्रेलियन विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत गतवर्षाच्या तुलनेत २५ % ने वाढ झाली आहे. २०१८ मध्ये जवळपास १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये अर्ज केला आहे.

ऑस्ट्रेलियन सरकारनं जारी केलेल्या परदेशी विद्यार्थ्यांच्या यादीतून ही आकडेवारी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिनी विद्यार्थ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. चीनमधल्या २ लाख ५५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी २०१८ वर्षांत ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी प्रवेश केला. चिनी विद्यार्थ्यांचा आकडा हा २०१७ च्या तुलनेत १० % वाढला आहे.

चीनच्या खालोखाल भारताचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियात शिकण्यासाठी येणारे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक विद्यार्थ्यी हे भारतीय आहे अशी ही आकडेवारी सांगते. २०१७ वर्षांत जवळपास ८७ हजार भारतीय विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठ आणि इतर शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला होता. २०१८ वर्षांत १ लाख ८ हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकण्यासाठी आले आहेत. या आकडेवारीत २५ % नीं वाढ झालेली पहायला मिळत आहे.

चीन, भारतापाठोपाठ नेपाळी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची पसंती ही सिडनी, मेलबर्न, गोल्ड कोस्ट इथल्या विद्यापीठांना मिळताना दिसून येत आहे.