अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात अभूतपूर्व अशा ‘हार्वे’ चक्रीवादळाने थैमान घातले असून स्वोलेन तलावात वाहून गेल्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

निखिल भाटिया असे या विद्यार्थ्यांचे नाव असून तो टेक्सासमधील ए अँड एम विद्यापीठात शिक्षण घेत होता. ब्रायन तलावातून त्याला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात यश आले होते. मात्र, गंभीर दुखापतींमुळे त्याची प्रकृती खालावत गेली आणि त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे. शालिनी सिंग या भारतीय मुलीसोबत पोहण्यासाठी गेलेला असताना निखिल वाहून गेला. भाटिया हा जयपूरचा असून तो आणि शालिनी (नवी दिल्ली) हे दोघे सार्वजनिक आरोग्य या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहेत. या दोघांना अतिशय गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

निखिल आणि शालिनी दोघेही पोहण्यासाठी तलावावर गेल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. ते दोघेही खोलवर गेल्यानंतर बुडू लागल्याने त्यांची माहिती तातडीने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना दिली होती, असेही या प्रत्यक्षदर्शी मित्रांनी सांगितले आहे. ‘हार्वे’ चक्रीवादळामुळे अमेरिकेत ठिकठिकाणी पूरसदृश स्थिती असताना हे दोघेही पोहण्यासाठी का गेले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ह्यूस्टन प्रांताचे भारतीय राजदूत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भारतीय दूतावासाच्या मदतीने निखिल भाटिया याची आई डॉ. सुमन भाटिया या टेक्सासमध्ये आल्या असून सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर निखिलचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.

टेक्सासमध्ये ३० बळी

ह्य़ूस्टन : ‘हार्वे’ चक्रीवादळामुळे अमेरिकेतील टेक्सास प्रांतात  थैमान घातले असून सलग पाचव्या दिवशीही या वादळामुळे येथील जनजीवन विस्कळीत आहे. हजारो लोक बेघर झाले असून आतापर्यंत विविध अपघातांमध्ये ३० जणांचा बळी गेला आहे. या भागातील चोऱ्या आणि लूट रोखण्यासाठी ह्य़ूस्टनच्या महापौरांनी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.हजारो बचावपथके दिवसरात्र कार्यरत असून पूरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.