नवी दिल्ली : दोन प्रौढांनी परस्पर संमतीने खासगी जागेत ठेवलेल्या समलैंगिक संबंधांमुळे सार्वजनिक सभ्यतेची किंवा नैतिकतेची हानी होत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचवेळी समाजाच्या कल्पनेनुसारची नैतिकता नव्हे, तर घटनेनुसार निश्चित असलेली नैतिकताच आम्ही विचारात घेतली आहे, असे न्यायालयाने नमूद केले.

प्रत्येक व्यक्तीचा स्वत:च्या शरीरावर सार्वभौम हक्क असतो आणि तो स्वत:चे स्वातंत्र्य स्वेच्छेने इतर व्यक्तीला सोपवू शकतो. खासगी जागेत त्यांनी कुणाच्या जवळ येणे हा त्यांच्या निवडीचा प्रश्न आहे, असे मुख्य निकालपत्र लिहिणारे सरन्यायाधीश दीपक मिश्रा व न्या. अजय खानविलकर यांनी म्हटले आहे.

इंद्रधनुषी रंगांचा झेंडा हे एलजीबीटीक्यू समुदायाचे चिन्ह आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील कलाकार, सैनिक आणि समलैंगिक हक्क कार्यकर्ता गिल्बर्ट बेकर याने १९७८ साली हा झेंडा तयार केला.त्यातील रंग हे वंश, लिंग, वय आणि राष्ट्रीयत्वानुसार या समुदायाच्या बंधुभावांचे प्रतीक आहेत. यातील भडक गुलाबी रंग लिंगाचा, लाल जीवनाचा, नारंगी उपचारांचा, पिवळा सूर्यप्रकाशाचा आणि हिरवा निसर्गाचा प्रतीक आहे. आकाशी रंग कलेचे, आस्मानी रंग एकतेचे आणि अखेरचा जांभळा रंग अंतरात्म्याचे प्रतीक आहे.