भूतानमध्ये भटकंतीसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तरुणाला अटक केली आहे. बौद्ध धर्मीयांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या ‘चॉर्टन’वर चढून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी (म्हणजेच लहानसे मंदिरासारखे प्रार्थनास्थळ) रॉयल भूतान पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अभिजित हजारे असल्याचे समजते.

अभिजित आणि त्याचे १५ सहकारी बाईक रायडींग करत भूतानमध्ये भटकंतीसाठी गेले होते. त्यावेळी स्थानिक मार्गदर्शकाच्या मदतीने भटकताना या ग्रुपमधील अभिजित हा चॉर्टनवर चढला असे वृत्त ‘द भूतानीस’ या वृत्तपत्राने दिले आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अभिजितचा शोध घेत त्याला अटक केली.

‘द भूतानीस’च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये अभिजित हा ‘चॉर्टन’वर चढल्याचे दिसत आहे. याच फोटोंमध्ये अभिजितचा जोडीदार जांबे हाही एका ‘चॉर्टन’वर बसलेला दिसत आहे. दोचुला या परिसरामध्ये आराम करण्यासाठी अभिजितचा ग्रुप थांबला होता त्यावेळी त्यांनी शिडी लावून ‘चॉर्टन’वर चढण्याचे हे कृत्य केले.

पोलिसांनी अभिजितला अटक करुन त्याचा पासपोर्ट जप्त केला आहे. सध्या त्याची चौकशी सुरु आहे.