जपानच्या योकोहामा बंदराजवळ एका आलिशान ‘क्रूझ’ला (पर्यटक जहाज) अलग ठेवण्यात आले असून त्यामध्ये करोना विषाणूची लागण झालेले ६१ जण आहेत. त्यामध्ये अनेक भारतीय खलाशांचा समावेश असून पश्चिम बंगालमधील एक नागरिकही आहे.

या पर्यटक जहाजावर करोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने पश्चिम बंगालमधील या नागरिकाने भारतीय अधिकाऱ्यांना तातडीने मदत करण्याची विनंती केली आहे. हा भारतीय उत्तर दिनाजपूर जिल्ह्य़ातील हातिपा गावचा रहिवासी असून त्याने समाजमाध्यमांवर जहाजावरील व्हिडीओ व्हायरल केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहोचण्याचाही त्याने प्रयत्न केला आहे. करोनाची लागण झाली आहे त्यांना स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था करण्यासाठी मोदी आणि बॅनर्जी यांनी जपान सरकारशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

‘..तर जिवंत राहणार नाही’

‘‘आम्ही भीतीच्या वातावरणात आहोत, क्रूझवर जवळपास २०० भारतीय खलाशी आहेत, आम्हाला लागण झालेली नाही त्यामुळे आम्हाला स्वतंत्र ठेवण्यात यावे’’, असे त्याने एका पोस्टमध्ये म्हटले आहे. आज आपण स्पष्ट आणि थेट संपर्क साधत आहोत कारण आम्ही घाबरलो आहोत, जर आपण बोललो नाही तर कदाचित उद्या आम्ही जिवंत राहणार नाही, असे त्याने सांगितले.