२०० भारतीय पर्यटक चितवनमध्ये अडकले

नेपाळच्या अनेक जिल्ह्य़ांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर व भूस्खलन यात बळी पडलेल्यांची संख्या ४९ वर गेली असून, हजारो लोक बेघर झाले आहेत.

गेले ३ दिवस नेपाळला मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून त्यामुळे पुराच्या व दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पुरामुळे २०० भारतीयांसह सुमारे ६०० पर्यटक चितवन या पर्यटनस्थळी अडकून पडले असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.

पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान १३ लोक जखमी झाले असून अद्याप १७ लोक बेपत्ता आहेत, असे गृहमंत्रालयाने सांगितले. २१ जिल्ह्य़ांना पूर व दरडी कोसळण्याचा जोरदार तडाखा बसला असल्याचे मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीवरून दिसत असल्याचे वृत्त ‘दि हिमालयन टाइम्स’ने दिले.

या आकडेवारीनुसार, पंचथार येथे एक, सिंधुलीत चार, झापा व बांके येथे प्रत्येकी एक, मोरांगमध्ये पाच, संसारीत आठ, सरलाही व सुरखेत येथे प्रत्येकी तीन आणि बारा व दांग येथे प्रत्येकी दोन जण ठार झाले. याशिवाय रौताहत येथे पूर व भूस्खलनात सात, बरडिया येथे दोन, तर धनुषा, मकवानपूर, कैलाई व पाल्पा जिल्ह्य़ांमध्ये प्रत्येकी एक जण मरण पावला.

या पुरामुळे सुमारे ३६ हजार घरे पाण्याखाली गेली असून एक हजार घरांचे नुकसान झाले आहे, तसेच ३९७ जनावरे मरण पावली आहेत, असेही या आकडेवारीत नमूद केले आहे. तराई भागातील अनेक शहरे पाण्याखाली गेली आहेत. पथलैया- निजगड भागातील दुधौरा पुलाचा एक स्तंभ बुडाल्यामुळे पूर्व- पश्चिम महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.