पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चिनी सैन्याच्या हेलिकॉप्टरच्या हालचाली वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने उंचावरील प्रदेशात खांद्यावरुन मिसाइल डागता येणाऱ्या एअर डिफेन्स सिस्टिमसह जवानांच्या तुकडया तैनात केल्या आहेत.
“शत्रुच्या विमानांनी हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यास त्यांना तात्काळ प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने उंचावरील प्रदेशात रशियन बनावटीच्या इग्ला एअर डिफेन्स सिस्टिमसह जवानांना तैनात केले आहे” एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
रशियन बनाटीच्या या एअर डिफेन्स सिस्टिमचा भारतीय लष्कर आणि इंडियन एअर फोर्स दोघेही वापर करतात. युद्धाच्या प्रसंगात किंवा शत्रूची फायटर विमाने, हेलिकॉप्टर तुमच्या तळाजवळ येतात, तेव्हा या सिस्टिमचा वापर केला जातो. भारताने सुद्धा आपली टेहळणी क्षमता वाढवली आहे.
चीनच्या हवाई हालचालींवर रडार्सच्या माध्यमातून लक्ष ठेवले जातेय तसेच जमिनीवरुन हवेत मारा करणारी मिसाइल्स सुद्धा सज्ज ठेवली आहेत. भारतीय हद्दीतील भागांमध्ये चिनी हेलिकॉप्टर्स प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सैन्याला दिसले आहे. पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याच्या हेलिकॉप्टर्सनी हवाई हद्दीचे उल्लंघन करु नये, यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून इंडियन एअर फोर्सने सुखोई फायटर विमाने तैनात केली आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 3:30 pm