स्मृती इराणी यांची लोकसभेत माहिती
जागतिक पातळीवर विद्यापीठ क्रमवारीचे विशिष्ट निकष पाळले जात असल्यामुळे भारतातील विद्यापीठांना त्यात स्थान मिळत नाही. जागतिक पातळीवरचे निकष हे विशिष्ट व्यक्तींच्या गटाला अपेक्षित असलेल्या संकल्पना व आकलनावर आधारित असतात, असे मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत सांगितले.
आपल्या देशातील विद्यापीठांची क्रमवारी करण्यासाठी सरकार एक नवीन व्यवस्था अमलात आणणार आहे. त्यातील निकष वस्तुनिष्ठ असतील. ‘नॅशनल इन्स्टिटय़ूशनल रँकिंग फ्रेमवर्क’च्या अंतर्गत ही नवीन प्रणाली राबवण्यात येईल, अशी माहिती इराणी यांनी दिली.
जागतिक क्रमवारीत भारतीय विद्यापीठांना फारसे स्थान नसले तरी क्यूएस व टीएचई सर्वेक्षणात आपल्या विद्यापीठांबाबतचे मत सकारात्मक व आशावादी आहे. जागतिक क्रमवारी ठरवताना अनेकदा असे निकष वापरले जातात जे व्यक्तिगत गटांच्या संकल्पना व आकलनाशी सुसंगत असतात. क्यूएस क्रमवारीनुसार आयआयएससी बंगलोर (१४७), आयआयटी दिल्ली (१७९), आयआयटी मुंबई (२०२), आयआयटी मद्रास (२५४), आयआयटी कानपूर (२७१), आयआयटी खरगपूर (२८६) , आयआयटी रूरकी (३९१) या प्रमाणे क्रमवारी आहे.
टाइम्स उच्च शिक्षण क्रमवारीत आयआयटी मुंबई (३५१-४००) आयआयटी रूरकी (३५१-४००), आयआयएससी बंगलोर (२७६-३००) याप्रमाणे क्रमवारी आहे. अध्यापन व संशोधन प्रक्रिया यात सुधारणेसाठी अनेक उपाय केले जात आहेत.
परदेशातील शिक्षणतज्ज्ञांद्वारे भारतात अध्यापन, पदवीपूर्व अभ्यासक्रम सुधारणे, पसंती आधारित श्रेयांकन प्रणाली राबवणे, असे उपाय करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.