भारतात महिला-पुरुष समानतेच्या गोष्टी करत असताना महिला आपले अस्तित्व सातत्याने सिद्ध करत आहेत. जगभरात सर्वाधिक महिला पायलट या भारतातील आहेत असे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी नुकतेच सांगितले. इंडियन वूमन पायलटस असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमादरम्यान सिन्हा बोलत होते. त्यामुळे महिला सबलीकरणाच्या गोष्टी करत असताना भारतीय महिला आघाडीवर असल्याचे चित्र आहे असे म्हटल्यास नक्कीच वावगे ठरणार नाही.

महिलांचा विमान वाहतूक क्षेत्रातील सहभाग या क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावत आहे असेही सिन्हा यांनी यावेळी सांगितले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अवकाश क्षेत्राचा योग्य पद्धतीने वापर केला तर आकाशात होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात आपण रोखू शकतो. वाहतूकीची विमाने उडविण्याबरोबरच वायूदलातही फायटर पायलट म्हणून आपले स्थान सिद्ध करत आहेत.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला फायटर पायलट ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ विमानं उडवणार आहेत. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग अशी या महिला वैमानिकांची नावं आहेत. या तिघींनी आपलं प्रशिक्षण नुकतंच यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. एका वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी जवळपास १५ कोटी खर्च येतो. इतिहासात पहिल्यांदाच महिला मिग-२१ बिसन्स हे विमान उडवणार आहेत पण, त्या महिला आहेत म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचं झुकतं माप देण्यात आलं नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.