नवी दिल्ली : अंतराळवीरासह अवकाशात उपग्रह पाठविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी केली. आता या मोहिमेची जबाबदारी एका महिलेच्या हाती सुपूर्द करण्यात येणार असून इस्रोच्या या प्रकल्पाचे नेतृत्व डॉ. व्ही. आर. ललिथंबिका या कंट्रोल रॉकेट इंजिनीयर करणार आहेत. त्या गेल्या ३० वर्षांपासून इस्रोमध्ये काम करीत आहेत.

गगनयान मोहिमेपूर्वी जीएसएलव्ही-३च्या आधारे दोन मानवरहित मोहिमा हाती घेण्यात येणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. गगनयान मोहिमेसाठी डॉ. ललिथंबिका त्यांच्यासोबत काम करणाऱ्या चमूची लवकरच निवड करणार असून कामाची आखणीही करणार आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत पहिला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गगनयान मोहिमेअंतर्गत पाठविण्यात येणार अवकाशयान चार ते पाच टन वजनाचे असेल, या प्रकल्पासाठी १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, या प्रकल्पामध्ये विविध संघटना, तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील मंडळी सहभागी असतील. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती होणार असल्याचेही बोलले जात आहे. ही मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे.