युवा कुस्तीपटू सागर धनकर याच्या हत्येप्रकरणी सध्या तिहार जेलमध्ये असलेला भारतीय ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार याने आता नवी मागणी केली आहे. सुशील कुमारला तिहार जेलमधल्या त्याच्या बरॅकमध्ये टीव्ही हवा आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनीच यासंदर्भातली माहिती दिली आहे. नुकतीच, दिल्ली न्यायालयाने सुशील कुमारची विशेष जेवण आणि कुस्तीपटूचा आहार मिळण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर आता त्याने टीव्हीची मागणी केली आहे. यावेळी कुस्तीविश्वास घडणाऱ्या घडामोडी माहिती होण्यासाठी टीव्ही हवा असल्याचं सुशील कुमारनं आपल्या अर्जात म्हटलं आहे. त्याने आपल्या वकिलाकरवी हा अर्ज तुरुंग प्रशासनाला दिला आहे.

सुशील कुमारने नुकतीच दिल्ली विशेष न्यायालयाला एक मागणी केली होती. त्यानुसार आपलं कुस्तीपटू म्हणून करिअर पुढेही सुरू ठेवण्यासाठी तुरुंगात आपल्याला कुस्तीपटूसाठीचा आहार मिळण्याची विनंती करण्यात आली होती. यामध्ये प्रोटीन देणाऱ्या हेल्थ सप्लिमेंट्स, ओमेगा-३ कॅप्सुल्स, जॉइंटमेंट कॅप्सुल्स, प्रि-वर्कआऊट सी-४, मल्टिव्हिटॅमिन जीएनसी आणि एक्सरसाईज बँड यांचा समावेश होता. मात्र, कोर्टाने त्याची ही मागणी फेटाळून लावल्यानंतर आता त्याने नवी मागणी केली आहे.

 

…म्हणून सुशील कुमारनं केली टीव्हीची मागणी

तिहार तुरुंगाचे डीजी (महासंचालक) संदीप गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. “सुशील कुमारने त्याच्या वकिलांमार्फत अशी विनंती केली आहे की त्याला बरॅकमध्ये टीव्ही हवा आहे. शुक्रवारी त्याने यासंदर्भातला अर्ज दिला आहे. तुरुंगाबाहेर आणि विशेषत: कुस्तीविश्वात काय घडतंय, याविषयीची माहिती मिळण्यासाठी त्याने टीव्हीची मागणी केली आहे”, असं गोयल म्हणाले आहेत.

अटक टाळण्यासाठी सुशील कुमार १८ दिवसांत ७ राज्यांमधून भटकला! पण शेवटी जाळ्यात अडकलाच!

सुशील कुमार याला काही दिवसांपूर्वीच मांडोली तुरुंगातून तिहार जेलच्या बरॅक नंबर २ मध्ये हलवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या त्याला स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आलं आहे. त्याला तिहारमध्ये हलवताना मांडोली जेलबाहेर काही पोलीस अधिकाऱ्यांना सुशील कुमारसोबत सेल्फी आणि फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. हे प्रकरण या पोलीस अधिकाऱ्यांच्या चांगलंच अंगलट आलं असून त्याची विभागांतर्गत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुशील कुमारसोबत फोटो काढण्याची हौस दिल्ली पोलिसांना पडली महागात!

दोन महिन्यांपूर्वी घडला होता गुन्हा

४ मे रोजी दिल्लीतल्या छत्रसाल स्टेडियमबाहेर सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांचं सागर धनकरसोबत भांडण झालं होतं. हा वाद विकोपाला जाऊन या सगळ्यांनी मिळून सागर धनकरला मारहाण केली. ही मारहाण इतकी जास्त होती की त्यामध्ये उपचारांदरम्यान सागर धनकरचा मृत्यू झाला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुशील कुमार फरार झाला होता. त्याला पोलिसांनी शिताफीने दिल्लीमधून अटक केली.