21 September 2018

News Flash

गणित आणि भौतिकशास्त्रात भारतीय खूपच हुशार; स्टीफन हॉकिंग यांचे कौतुकास्पद उद्गार

२००१मध्ये केला होता १६ दिवसांचा भारताचा दौरा

संग्रहित छायाचित्र

भारतीय लोक हे गणित आणि भौतिकशास्त्र विषयात खूपच हुशार आहेत, असे गौरोद्गार ब्रिटनचे जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी काढले काढले होते, त्यांचे बुधवारी निधन झाले. २००१मध्ये पहिल्यांदा ते भारताच्या १६ दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. या काळात त्यांनी मुंबई, दिल्लीसह इतर महत्वाच्या शहरांना भेटी देऊन भौतिकशास्त्रातील संशोधनांवर भाषणं दिली होती. यावेळी त्यांनी तत्कालीन राष्ट्रपतींशी संवाद साधताना भारतीयांबाबत गौरोद्गार काढले होते.

HOT DEALS
  • Sony Xperia XZs G8232 64 GB (Ice Blue)
    ₹ 34999 MRP ₹ 51990 -33%
    ₹3500 Cashback
  • Apple iPhone 8 Plus 64 GB Space Grey
    ₹ 75799 MRP ₹ 77560 -2%
    ₹7500 Cashback

स्टीफन हॉकिंग यांची ही भेट भारतीयांसाठीही अविस्मरणीय भेट ठरली होती. आपल्या दौऱ्यादरम्यान, हॉकिंग यांनी मुंबईत टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथे आयोजित आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र सेमिनारमध्ये उपस्थित शास्त्रज्ञांना संबोधीत केले होते. यावेळी हॉकिंग यांना प्रतिष्ठीत सरोजिनी दोमोधरन फेलोशिपने सन्मानित करण्यात आले होते. या पाच दिवसांच्या सेमिनारमध्ये हॉकिंग यांनी अनेक लेक्चर्स दिली होती. त्यानंतर हॉकिंग यांच्यासाठी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने खास डिझाईन करण्यात आलेल्या वाहनातून त्यांनी आपल्या व्हिलचेअरसह मुंबई शहराची पाहणी केली होती. दरम्यान, हॉकिंग यांचा ५९वा वाढदिवस त्यांनी ओबेरॉय टॉवर्स हॉटेल येथे साजराही केला होता.

त्यानंतर स्टीफन हॉकिंग यांनी तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली होती. यावेळी राष्ट्रपती आणि हॉकिंग यांच्या सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली होती. हा दोघांसाठीही हा अविस्मरणीय अनुभव होता. यावेळी भारतीय हे गणित आणि भौतिकशास्त्र विषयात खुपच हुशार असल्याचे हॉकिंग राष्ट्रपतींजवळ म्हणाले होते. दरम्यान, हॉकिंग हे मानवी आशेचे प्रतिक असून अपंगत्व स्विकारावे लागलेल्या प्रत्येकासाठी ते प्रेरणा स्त्रोत असल्याचे राष्ट्रपती म्हणाले होते.

दरम्यान, हॉकिंग यांनी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतर मैदान आणि कुतुब मिनारला भेट दिली होती. १५ जानेवारी २००१ रोजी त्यांनी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या स्मरणार्थ लेक्चरही दिले होते.

स्टीफन हॉकिंग यांनी विश्वनिर्मीतीच्या संशोधनाला आधुनिक स्वरुप दिले होते. त्याचबरोबर जे लोक आयुष्यात आलेल्या अपंगत्वाला तोंड देत आहेत त्यांच्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत होते. त्यांचे बुधवारी १४ मार्च २०१८ रोजी ७६व्या वर्षी ब्रिटनमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले.

First Published on March 14, 2018 4:04 pm

Web Title: indians are so good at mathematics and physics when stephen hawking came to india