स्विस बँकांमध्ये भारतीयांनी जमा केलेली रक्कम २० हजार कोटींच्या पुढे गेली आहे. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने गुरुवारी जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीनुसार, सन २०२० मध्ये भारतीय नागरिक आणि कंपन्यांनी स्विस बँकांमध्ये सुमारे २०,७०० कोटी रुपये जमा केले आहेत.

एकीकडे खासगी बँक खात्यात जमा केलेली रक्कम खाली आली असताना वित्तीय संस्था आणि कंपन्यांनी सिक्युरिटीज व इतर मार्गांनी बरीच रक्कम जमा केली आहे. स्विस नॅशनल बँक (एसएनबी) च्या आकडेवारीनुसार, २०१९ च्या अखेरीस भारतीयांच्या ठेवींची संख्या ६,६२५ कोटी इतकी आहे.

सर्वाधिक १३ हजार ५०० काेटी रुपये बाँड, सुरक्षा ठेव व इतर माध्यमांद्वारे गुंतविण्यात आले

बँकेच्या माहितीनुसार, यापुर्वी २००६ मध्ये भारतीय ठेवींनी ६.५ अब्ज स्विस फ्रँकची विक्रमी नोंद गाठली होती. परंतु त्यानंतर २०११, २०१३ आणि २०१७ वगळता भारतीयांनी स्विस बँकांमध्ये पैसे जमा करण्यात फारसा रस दाखविला नाही. परंतु २०२० ने जमा रक्कमेचा सर्व आकड्यांचे रेकॉर्ड मोडले. २०२० मध्ये जेथे खासगी ग्राहकांच्या खात्यात भारतीय ठेवींमध्ये सुमारे ४००० कोटी रुपये होते, तर इतर बँकांमार्फत ३१०० कोटी रुपये जमा झाले. तसेच सर्वाधिक १३ हजार ५०० काेटी रुपये बाँड, सुरक्षा ठेव व इतर माध्यमांद्वारे गुंतविण्यात आले आहेत. ही आकडेवारी अधिकृत असून काळ्या पैशाशी या आकडेवारीचा संबंध नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.