परदेशात असताना अडचण निर्माण झाल्यास ट्विटरवर मला टॅग करा, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. ‘परदेशात असताना काही समस्या असल्यास संबंधित दूतावासाला ट्विट करा आणि त्यामध्ये मला टॅग करा,’ असे आवाहन सुषमा स्वराज यांनी केले आहे.

‘परदेशात असताना एखादी समस्या निर्माण झाल्यास संबंधित दूतावासाला ट्विटवरुन माहिती द्या. या ट्विटमध्ये मला टॅग करा. मग मला वैयक्तिकपणे सर्व स्थितीकडे लक्ष देता येईल,’ असे सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ट्विटरचा वापर करत असल्याचेदेखील सुषमा स्वराज म्हणाल्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे, यासाठी हा नवा पर्याय वापरणार असल्याचे स्वराज यांनी म्हटले आहे.

‘मी हा नवा पर्याय वापरत आहे. तुमची समस्या संबंधित भारतीय दूतावासाला/विभागाला सांगा. त्यात @sushmaswaraj चा उल्लेख करा,’ असे ट्विट सुषमा स्वराज यांनी केले आहे. सुषमा स्वराज यांनी नुकतीच ‘ट्विटर सेवा’ सुरू केली होती. जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचता यावे आणि त्यांना मदत मिळावी, यासाठी या सेवेची सुरुवात करण्यात आली.

सुषमा स्वराज यांनी आतापर्यंत ट्विटरवरुन अनेकांची मदत केली आहे. परदेशात अडकून पडलेल्या, अडचणीत असलेल्या अनेकांनी आतापर्यंत त्यांचे गाऱ्हाणे ट्विटरवर सांगितले आहे. यानंतर सुषमा स्वराज यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात दिला आहे. काही दिवसांपूर्वी किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. या काळात रुग्णालयात असतानाही सुषमा स्वराज ट्विटरवर लोकांची मदत करत होत्या. सुषमा स्वराज यांच्या प्रमाणेच रेल्वेमंत्री सुरेश प्रभूदेखील ट्विटरवर सक्रीय असतात आणि रेल्वे प्रवाशांना सर्वोतोपरी सहाय्य करण्याचा प्रयत्न करतात.