देशात उत्पादित वस्तूच वापरण्याचे पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

नवी दिल्ली: भारतीयांनी परदेशी उत्पादनांना पर्याय असलेल्या भारतीय वस्तू वापरण्याचा संकल्प नवीन वर्षांच्या निमित्ताने करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात केले.

या वर्षांतील शेवटच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी म्हणाले, ‘‘आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘व्होकल फॉर लोकल’ या मोहिमेला लोकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता उत्पादक आणि उद्योजकांनी जागतिक दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन करावे.’’ सरते वर्ष आत्मनिर्भर भारताचे प्रतिध्वनी उमटवणारे ठरले, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांनी गुरु गोविंद सिंग, माता गुजरी, श्रीगुरु तेग बहादूरजी यांना आदरांजली वाहिली. त्यांचा त्याग आणि करुणेचा उल्लेखही केला.

काश्मिरी केशर

स्वदेशी उत्पादनांबाबत बोलताना मोदी यांनी काश्मिरी केशराचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, की सरकारने काश्मिरी केशर जागतिक नकाशावर आणण्याचे प्रयत्न केले. त्याला भौगोलिक ओळख (जीआय टॅग) मिळवून दिली.

जनता संचारबंदी प्रेरणादायी

‘मन की बात’ कार्यक्रमाला प्रतिसादाबाबत मोदी म्हणाले, की करोनाकाळात भारताने दाखवलेल्या सामूहिक सामर्थ्यांचे जगाने कौतुक केले आहे. जनता संचारबंदी हा जगासाठी प्रेरणेचा विषय ठरला असेही ते म्हणाले.

शिक्षकांचे कल्पक काम

शिक्षकांनी करोनाकाळात कल्पकतेने काम केले आहे. त्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम तयार केले आहेत. शिक्षकांनी जे शैक्षणिक साहित्य तयार केले, ते शिक्षण मंत्रालयाच्या दीक्षा पोर्टलवर टाकावे, असे आवाहन मोदी यांनी केले. त्यातून दूरस्थ भागात राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मोदी म्हणाले..

’स्वदेशी वस्तू वापरण्याची घोषणा घरोघरी पोहोचली आहे. देशातील उत्पादकांनी या संधीचा फायदा घेऊन जागतिक दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन करावे.

’लोकांनी वापरातील वस्तूंची यादी करावी. त्यातील परदेशी उत्पादने कोणती हे पाहावे आणि त्यांना देशात उत्पादित वस्तूंचे पयार्य शोधावेत.

’नवीन वर्षांत देशात उत्पादन झालेल्या वस्तूच खरेदी करण्याचा संकल्प करणे योग्य ठरेल.

प्लास्टिकमुक्ती : एकदाच वापराच्या प्लास्टिकचा मुद्दा मोदी यांनी पुन्हा मांडला. ते म्हणाले, करोना साथीच्या काळात प्लास्टिकचा मुद्दा फारसा चर्चेत राहिला नाही, पण एकदा वापराच्या प्लास्टिकपासून मुक्तीचा संकल्प नवीन वर्षांत करावा.

वाघांची संख्या : वन्यजीव संवर्धनाबाबत मोदी यांनी बिबटय़ांची संख्या देशात साठ टक्के वाढल्याचा उल्लेख केला. देशात २०१४ मध्ये ७,९०० बिबटे होते आता १२,८५२ आहेत. ही वर्षांतील मोठी कामगिरी आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

सध्या दुकानदार स्वदेशी खेळणी आणि इतर उत्पादनांची विक्री करीत आहेत. ग्राहकही स्वदेशी वस्तूंची मागणी करीत आहेत. केवळ एक वर्षांत लोकांच्या मनोवृत्तीत एवढा मोठा बदल झाला आहे. 

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान