भारतातील सर्वाधिक श्रीमंत १०० व्यक्तींच्या यादीमधील सर्वजण अब्जाधीश असल्याचे फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सामान्यांसाठी नसले तरी या श्रीमंत व्यक्तींसाठी ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी सलग आठव्या वर्षी या यादीतील प्रथम स्थान कायम राखले आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्यावर्षीच्या तुलनेत २६० कोटी डॉलर्सची भर पडली असून, त्यांची एकूण संपत्ती २३६० कोटी अमेरिकी डॉलर्सवर जाऊन पोहोचली आहे. त्यांच्यापाठोपाठ दिलीप संघवी यांनी १५८० कोटी डॉलर्सच्या संपत्तीसह दुसरा क्रमांक पटकावला आहे. स्टील उद्योगातील सम्राट लक्ष्मी मित्तल यांची यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. विप्रोचे अझीम प्रेमजी १६४० कोटी डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर तर देशाच्या बांधकाम उद्योगातील प्रमुख असणाऱ्या शापुर्जी पालनजी समूहाचे प्रमुख पालनजी मिस्त्री यांची एकूण संपत्ती १५९० कोटी इतकी असून, ते यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहेत.
ही यादी जाहीर करताना फोर्ब्सने भारतात अच्छे दिन कोणासाठी आले असतील, तर या धनिकांसाठी आले असल्याचे म्हटले आहे. या १०० धनिकांची संपत्ती एकत्रित केल्यास हा आकडा ३४६०० कोटी अमेरिकी डॉलर्स इतका दिसतो. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भारतीय शेअर बाजारात असलेल्या उत्साही वातावरणामुळे या धनिकांच्या संपत्तीत भर पडण्यास मोठी मदत झाली आहे.