कौशल्य विकास योजनेतंर्गत केंद्र सरकार देशातील ३ लाख युवकांना जपानमध्ये ३ ते ५ वर्षांसाठी ऑन-जॉब ट्रेनिंगसाठी पाठवणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी दिली. विशेष म्हणजे, भारतीय टेक्निकल इंटर्न्सच्या कौशल्य प्रशिक्षणावर येणारा खर्च जपान करणार आहे.

कौशल्य विकास मंत्री प्रधान म्हणाले की, कॅबिनेटने भारत आणि जपान यांच्यादरम्यान टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्रॅम (टीआयटीपी) बाबत होणाऱ्या कराराला (एमओसी) मंजुरी दिली आहे. आगामी जपान दौऱ्यात या एमओसीवर स्वाक्षरी होईल, असे प्रधान यांनी सांगितले. प्रधान हे टोकियोच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असून दि. १६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या दौऱ्याला प्रारंभ होईल.

प्रधान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, टीआयटीपी हा एक अत्यंत महत्वकांक्षी कार्यक्रम असून याअंतर्गत ३ लाख भारतीय टेक्निकल इंटर्न्सना ३ ते ५ वर्षांसाठी जपानमध्ये ऑन जॉब ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणार आहे. पुढील ३ वर्षांत युवकांना जपानच्या आर्थिक सहकार्याने प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल.

तिथे जाणाऱ्या प्रत्येक युवकाचा कार्यकाळ हा ३ ते ५ वर्षे असेल. हे युवक जपानी वातावरणात काम करतील. तिथे राहण्याच्या व जेवणाच्या सुविधेबरोबरच रोजगाराची संधीही मिळेल. यातील ५० हजार युवकांना जपानमध्ये नोकरीही मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.

जपानच्या गरजेनुसार या युवकांची निवड अत्यंत पारदर्शकपणे केली जाईल. जेव्हा हे युवक जपानवरून परततील तेव्हा ते आपल्या देशातही योगदान देतील, असे प्रधान यांनी म्हटले. एका निवेदनात म्हटले आहे की, एमओसीच्या माध्यमातून कौशल्य विकास क्षेत्रामध्ये दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय सहकार्याचा मार्ग खुला होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.