भारताचा करोना रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) हा जगातील इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. दरम्यान, अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटली या करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे भारतापेक्षा कमी आहे.

आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, केंद्रासोबतच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी करोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी आखलेली स्पष्ट रणनीती, सक्रियता तसेच आखले गेलेले कडक निकष याचा परिणाम भारतात सातत्याने करोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत राहिला तर वेगाने करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्येत घट आणि मृत्यूदर कमी होण्यात झाला.

दरम्यान, जगाचा एकत्रित रिकव्हरी रेट हा ७०.२७ टक्के इतका आहे. यामध्ये भारताचा रिकव्हरी रेट हा ९५.३१ टक्के आहे. तर अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटली या देशांचा रिकव्हरी रेट भारतापेक्षा कमी आहे, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

दररोजच्या आकडेवारीनुसार, भारतात रुग्ण बरे होण्याचं प्रमाणं हे उच्च आहे. त्यानुसार, बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या जवळपास ९५ लाख आहे. त्याचबरोबर बरे होणारे रुग्ण आणि अॅक्टिव्ह रुग्ण यामध्येही सातत्याने वाढ होत आहे. आजवरची ही संख्या ९१,६७,३७४ इतकी आहे.