जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत देशभरात ८५ हजार ३६२ नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ५९ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. एकूण करोनाबाधितांची संख्या ५९ लाख ३ हजार ९३३ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण ५९ लाख ३ हजार ९३३ करोनाबाधितांमध्ये ९ लाख ६० हजार ९६९ अॅक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले व डिस्चार्ज मिळालेले ४८ लाख ४९ हजार ५८५ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ९३ हजार ३७९ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

कालपर्यंत (२५ सप्टेंबर) देशात एकूण ७,०२,६९,९७५ नमूने तपासण्यात आले. त्यातील १३ लाख ४१ हजार ५३५ नमूण्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत बायोटेकने विकसित केलेल्या स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी लवकरच सुरु होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ आणि गोरखपूरमध्ये ‘कोव्हॅक्सीन’ची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु होणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केले आहे.