देशात करोना विषाणूचा प्रसार वेगानं होत असल्याचं दिसून असून, दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यातच आता आणखी एक चिंतेची भर पडली आहे. एका रुग्णापासून इतर लोकांना संसर्ग होण्याच्या प्रमाणात मार्चनंतर पहिल्यांदाच मोठी वाढ झाली आहे. करोना प्रजनन दर अर्थात R ज्यात मोठी वाढ झाली आहे. दुसरा अनलॉक जाहीर केल्यानंतर ही वाढ दिसून आली आहे. चेन्नईतील इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सनं केलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सनं केलेल्या अभ्यासानुसार एका रुग्णापासून इतर व्यक्तींना संक्रमण होण्याचा दर मार्चपासून कमी झाला होता. मात्र त्यात मार्चनंतर पहिल्यांदाच मोठी वाढ झाली आहे. जुलैमध्ये लॉकडाउन काही प्रमाणात शिथिलता आणल्यानंतर ही वाढ झाली आहे. सध्या संक्रमण दर १.१९ इतका आहे.

या वाढीविषयी बोलताना संशोधक डॉ. सीताभरा सिन्हा म्हणाले, “या संक्रमण दरवाढीचा अर्थ असा आहे की, एक रुग्ण १.१९ लोकांना संक्रमित करत आहे. सर्वसाधारणपणे प्रभाव वाढण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी कमीत कमी दहा दिवसांपासून दोन आठवड्याचा काळ लागतो. त्यामुळे मला असं वाटत की संक्रमण दरात जी वाढ झाली आहे, ती जूनच्या मध्यावधी किंवा त्यानंतर झाली आहे. सध्या आपण मे आणि जूनच्या सुरूवातील जी परिस्थिती होती. त्या परिस्थितीत आहोत. जूनच्या अखेरीस जी कमी दिसून आली, त्यात सातत्य नव्हते, तसेच कोणती सुधारणाही नव्हती,” असं सिन्हा म्हणाले.

मार्च महिन्यामध्ये करोना संक्रमणाचा दर १.८३ टक्के इतका होता. त्याच वेळी वुहानमध्ये हा दर सरासरी २.१४ , इटलीमध्ये २.७३ इतका होता. त्यानंतर ६ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीत भारतातमध्ये यात घसरण झाली होती. हा दर १.५५ इतका झाला होता. त्यानंतरही सातत्यानं हा दर कमी होताना दिसत होता. जूनच्या सुरूवातीला संक्रमण दर १.०२ इतका कमी झाला होता. मात्र, लॉकडाउन टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एक महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर संक्रमण दर २ ते ५ जुलैच्या दरम्यान वाढून १.१९ इतका झाला आहे.