देशात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात तब्बल ७६ हजार ४७२ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, १ हजार २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ३४ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे.

देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ३४ लाख ६३ हजार ९७३ वर पोहचली आहे. यामध्ये ७ लाख ५२ हजार ४२४ अॅक्टिव्ह रुग्ण, रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले व करोनातून बरे झालेले २६ लाख ४८ हजार ९९९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ६२ हजार ५५० जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. देशातही मागील काही दिवसांपासून दररोज ५० ते ६० हजारांच्या वर करोनाबाधितांची नोंद होत आहे. जगभरातील करोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी भारतापेक्षा सर्वाधिक मृत्यूची नोंद मॅक्सिकोत झाली होती. तर आतापर्यंत करोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिका आणि ब्राझीलमध्ये झाले आहेत.

अमेरिकेत करोनामुळे १ लाख ८५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे त्या खालोखाल ब्राझीलमध्ये १ लाख १९ हजार जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. भारतात जून महिन्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्यास सुरूवात झाली. यानंतर करोनाबाधितांच्या एकूण संख्येत आणि करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून आली.