देशात करोना संसर्गाचा उद्रेक झाल्याचे दिसत आहे. करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येने आता ४३ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात तब्बल ८९ हजार ७०६ नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४३ लाख ७० हजार १२९ वर पोहचली आहे.

देशभरातील ४३ लाख ७० हजार १२९ करोनाबाधितांमध्ये ८ लाख ९७ हजार ३९४ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ३३ लाख ९८ हजार ८४५ जण व आतापर्यंत मृत्यू झालेले ७३ हजार ८९० जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

देशभरात ८ सप्टेंबरपर्यंत ५,१८,०४,६७७ नमूने तपासण्यात आले आहेत. यातील ११ लाख ५४ हजार ५४९ नमून्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आले आहे.

दरम्यान, करोनाविरोधातील लढ्यात मोठा धक्का बसला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात जास्त अपेक्षा असणाऱ्या ऑक्सफर्डच्या AZD1222 या लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची करोना लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडल्यानंतर करोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.