देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे करोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणाऱ्या करोनाबाधितांची संख्याही मोठी आहे. तर दुसरीकडे रुग्णांच्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८६ हजार ०५२ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसंच यानंतर देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं ५८ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे देशात एका दिवसात विक्रमी चाचण्यांचीही नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८६ हजार ०५२ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून १ हजार १४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील करोनाबाधितांच्या एकून संख्येनं ५८ लाख १८ हजार ५७१ वर पोहोचली आहे. देशात सध्या ९ लाख ७० हजार ११६ रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ४७ लाख ५६ हजार १६५ जणांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ९२हजार २९० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे देशातील करोनाच्या चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात १३ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहे. दिवसभरात १३ लाख ८० हजार चाचण्या करण्यात आल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे.