जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही वाढतच आहे. देशभरातील करोनाबाधितांची संख्ये आता ९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत २८ हजार ४९८ नवे रुग्ण आढळले असून, ५५३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

देशभरातील करोनाबाधितांची संख्या आता ९ लाख ६ हजार ७५२ वर पोहचली आहे. यामध्ये अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ३ लाख ११ हजार ५६५ असून, आतापर्यंत ५ लाख ७१ हजार ४६० जणांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत देशभरात २३ हजार ७२७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

१३ जुलैपर्यंत देशभरात १ कोटी २० लाख ९२ हजार ५०३ नमूण्यांची तपासणी केली गेली आहे. यातील २ लाख ८६ हजार २४७ नमूने काल(सोमवार) तपासण्यात आले असल्याची माहिती ‘आयसीएमआर’ कडून देण्यात आली आहे.

दरम्यान, रेमडेसीवीर व टोसिलिझुमाब या औषधांचा वापर करोनावरील उपचारासाठी करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी त्याच्या चांगल्या परिणामांपेक्षा वाईट परिणाम अधिक आहेत. परिणामी त्यांचा वापर काळजीपूर्वक केला जावा, असे भारतीय वैद्यक संशोधन परिषद व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यांनी दिला आहे. या औषधांची मात्रा योग्य प्रमाणात देणेच आवश्यक आहे. त्याच्या जास्त वापराने आरोग्यास धोका निर्माण होतो असे सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे करोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. एकीकडे अनेक देशांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा शाळा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची परिस्थिती अजून गंभीर होईल अशी भीती व्यक्त केली असून, शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका असा इशाराच दिला आहे.