देशातील करोना संसर्गाचा वेग जरी काहीसा कमी झाल्याचा दिसत असला तरी देखील, अद्यापही करोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. देशभरातातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता १ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात २५ हजार १५३ नवे करोनाबाधित आढळले असून, सध्या देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ४५ लाख १३६ वर पोहचलेली आहे. तसेच, सद्यस्थितीस देशात ३ लाख ८ हजार ७५१ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत ९५ लाख ५० हजार ७१२ जण करोनामुक्त झाले असल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे.
India’s #COVID19 case tally crosses the 1-crore mark with 25,153 new infections; death toll at 1,45,136
Total numbers of recovered and active cases are 95,50,712 and 3,08,751 respectively pic.twitter.com/GSpwrMpiz2
— ANI (@ANI) December 19, 2020
दरम्यान, भारताचा करोना रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) हा जगातील इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटली या करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे भारतापेक्षा कमी आहे.
देशात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळमध्ये करोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे जवळपास ५२ टक्के इतके आहे. दररोज करोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येतही घट झाली असून गेले १३ दिवस बळींची संख्या ५०० हून कमी आहे.
याशिवाय, देशात कोविड १९ प्रतिबंधक लस घेणे नागरिकांसाठी ऐच्छिक राहील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारतात विकसित करण्यात आलेल्या लशी इतर देशांतील लशीइतक्याच परिणामकारक आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
करोनाची तिसरी लाटही ओसरली असून ९५.४० टक्के रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. करोना मुक्त होण्याचे प्रमाण हे उपचाराधीन रुग्णांच्या ३० पटीने जास्त आहे. बाधित रुग्ण आणि करोनामुक्त रुग्ण यांच्यातील तफावत दिवसेंदिवस वाढत आहे, असे देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधोरेखित केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 19, 2020 9:55 am