भारतात करोनाबाधित रुग्णसंख्येने ३९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत देशात ८३ हजार ३४१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १०९६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ३९ लाख ३६ हजार ७४८ इतकी झाली आहे. सध्या देशात ८ लाख ३१ हजार १२४ अॅक्टिव्ह केसेस असून ३० लाख ३७ हजार १५२ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत ६८ हजार ४७२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोनाच्या रुग्णवाढीने राज्यासह देशात गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. देशात दिवसभरात ८३,८८३ तर राज्यात १८,१०५ नव्या रुग्णांची भर पडली. महाराष्ट्रातही बाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यात रुग्णवाढीबरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. नागपूर आणि पुणे या दोन शहरांमध्ये रुग्णसंख्येचा आलेख वाढत चालला आहे. राज्यात दिवसभरात १३,९८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख ४३ हजार झाली असून, २५,५८६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा अधिक आहे.

टाळेबंदी पूर्णपणे हटवण्याची शास्त्रज्ञांची मागणी
देशातील टाळेबंदी पूर्णपणे मागे घेण्यात यावी, असे निवेदन देशातील विविध संस्थांतील सुमारे ४० शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केलं आहे. करोनाच्या नियंत्रणासाठी उपाय योजतानाच इतर अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लसीकरण, इतर आजारांवरील उपचार, व्यवस्थापन, गर्भवतींसाठीच्या योजना अशा मुद्दय़ांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील. सार्वजनिक वाहतुकीवरील र्निबध आणि इतर र्निबधांमुळे आर्थिक उलाढालींवरही परिणाम होत आहे’, असे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.