देशातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी करोनाबाधितांच्या संख्येत काही अंशी घट पाहायला मिळाली होती. परंतु आता पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८६ हजार ८२१ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यानंतर देशातील करोनाबाधितांची एकून संख्या ६३ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

गेल्या चोवीस तासांत देशात ८६ हजार ८२१ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर १ हजार १८१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६३ लाख १२ हजार ५८५ वर पोहोचली आहे. देशात सध्या ९ लाख ४० हजार ७०५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ५२ लाख ७३ हजार २०२ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत करोनामुळे ९८ हजार ६७८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.

दरम्यान, देशातील करोना चाचण्यांच्या संख्येतही मोठी वाढ करण्यात आली आहे. देशात ३० सप्टेंबर रोजी १४ लाख २३ हजार ०५२ जणांची करोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत ७ कोटी ५६ लाख १९ हजार ७८१ जणांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.