देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत घसरण दिसली होती. परंतु आता पुन्हा एकदा ही संख्या वाढताना दिसत आहे. देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येनं ६८ लाखांचा टप्पा पार केला असून गेल्या २४ तासांमध्ये ७८,५२४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर चोवीस तासांमध्ये ९७१ जणांच्या मृत्यूचीही नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ७८ हजार ५२४ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६८ लाख ३५ हजार ६५६ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे देशात सध्या ९ लाख २ हजार ४२५ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५८ लाख २७ हजार ७०५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत देशात १ लाख ५ हजार ५२६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागनं दिली आहे.

दरम्यान, देशात करोना चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. बुधवारी देशात ११ लाख ९४ हजार ३२१ जणांची करोना चाचणी करण्यात आली. ७ ऑक्टोबरपर्यंत देशात एकूण ८ कोटी ३४ लाख ६५ हजार ९७५ जणांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.