गेल्या काही महिन्यांपासून देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. काही दिवसांपूर्वी करोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून आलं होतं. परंतु आता पुन्हा ही संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८१ हजारांपेक्षा अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर १ हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे यातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. देशात आतापर्यंत ५३ लाखांपेक्षा अधिक जणांनी करोनावर मात केली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८१ हजार ४८४ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसंच १ हजा ०९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६३ लाख ९४ हजार ४८४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे देशात सध्या ९ लाख ४२ हजार २१७ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५३ लाख ५२ हजार ०७८ जणांनी करोनावर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसंच आतापर्यंत ९९ हजार ७७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचंही सांगण्यात आलं.

सध्या देशात करोनाच्या चाचण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर रोजी देशात १० लाख ९७ हजार ९४७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तसंच आतापर्यंत देशभरात ७ कोटी ६७ लाख १७ हजार ७२८ जणांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.