युवक काँग्रेसच्या मासिकाने ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘चहावाला’ म्हटले, त्यांच्याच नेतृत्त्वाखाली भारताच्या क्रेडिट मानांकनात सुधारणा झाली, अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर पलटवार केला. ‘मोदींच्या कार्यकाळात मूडीजने भारताच्या क्रेडिट रेटिंगमध्ये वाढ केली. मोदींच्याच कार्यकाळात उद्योगस्नेही देशांच्या यादीतही भारताने भरारी घेतली,’ असे इराणी यांनी म्हटले.

मंगळवारी युवा देश नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवण्यात आली होती. मोदींवर टीका करताना ‘युवा देश’कडून अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आला होता. एका व्यंगचित्राच्या माध्यमातून ‘युवा देश’कडून मोदींवर टीका करण्यात आली होती. या व्यंगचित्रात मोदींसह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मेदेखील होत्या. मे पंतप्रधान मोदी यांना ‘तुम्ही चहा विका,’ असे म्हणत असल्याचे व्यंगचित्रातून दाखवण्यात आले होते. यावरुन भाजपने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती.

यावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीदेखील काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘गुजराती लोकांची खिल्ली उडवणे काँग्रेससाठी नवे नाही. गुजरातचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला येथील जनता मतदानातून उत्तर देईल’, असे इराणी म्हणाल्या. यावेळी इराणी यांनी अखिलेश यादव यांच्याकडून गुजरातवर करण्यात आलेल्या टीकेचाही उल्लेख केला. अमिताभ बच्चन यांनी गुजरातच्या गाढवांसाठी जाहिराती करु नयेत, असे विधान काही महिन्यांपूर्वी अखिलेश यांनी केले होते, असे इराणी यांनी सांगितले.

स्मृती इराणी यांच्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही काँग्रेसवर तोंडसुख घेतले. ‘काँग्रेसने आतापर्यंत कोणताही धडा घेतला नसेल, तर यापुढेही ते काही बोध घेतील, असे वाटत नाही,’ असे जेटलींनी म्हटले. मंगळवारी व्यंगचित्रातून केलेल्या टीकेबद्दल आज ‘युवा देश’ने माफी मागितली आहे. ‘भारतीय युवक काँग्रेस अशा टीकेचे समर्थन करत नाही,’ असे युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा यांनी म्हटले.