भारतात जुलैच्या सुमारास करोना विषाणूची शिखरावस्था गाठली जाऊन मृतांची संख्या १८ हजारापर्यंत जाऊ शकते, असे साथरोग व सार्वजनिक आरोग्य तज्ञ तसेच सेंटर फॉर कंट्रोल ऑफ क्रोनिक  कंडिशन्स या संस्थेचे संचालक प्रा. डी. प्रभाकरन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, अजूनही करोनाची साथ चढत्या क्रमाने पुढे जात आहे. प्रभाकरन हे लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेतही प्राध्यापक आहेत. त्यांनी म्हटले आहे की, भारतातील करोनाची साथ जुलैत शिखरावस्थेत राहील व तेव्हा भारतातील बळींची संख्या १८ हजार असू शकते. सध्या जी वेगवेगळी प्रारूपे सादर करण्यात आली आहेत त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भारतात रुग्णांची संख्या चार ते सहा लाख राहील त्यात मृत्युदर तीन टक्के राहील. त्यामुळे अंदाजे १२ ते १८ हजार बळी जातील.

भारतात मृत्यूचा दर कमी का राहील, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, कुठलीही साथ जेव्हा संपण्याच्या दिशेने वाटचाल करते तेव्हा मृत्युदर कमी असतो. इटली व अमेरिका यांच्या तुलनेत भारतात तरुणांची संख्या अधिक आहे, त्यामुळेही मृत्युदर कमी राहील. वय हा यात महत्त्वाचा घटक असतो. वयस्कर लोकांना करोनाचा धोका अधिक आहे. याशिवाय बीसीजी लसीकरण, मलेरिया प्रतिरोध, अस्वच्छतेमुळे नेहमीच होणाऱ्या संसर्गामुळे वाढलेली प्रतिकारशक्ती, उष्ण हवामान या घटकांचाही संबंध आहे पण त्याचे पुरावे नाहीत.  इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेचे जी. व्ही. एस. मूर्ती यांच्या मते दक्षिण आशियात सर्वात कमी मृत्युदर श्रीलंकेत आहे.  १० लाख लोकांमध्ये तो ०.४ आहे. भारत, सिंगापूर, पाकिस्तान, बांगलादेश यांचे मृत्युदरही दर दहा लाखात कमी आहेत. या देशात मृत्युदर कमी का आहे हे सांगणे अवघड आहे. टाळेबंदी लवकर लागू केल्याने या देशांनी लोकांचे संपर्क टाळून संसर्ग कमी केला. युरोप व अमेरिकेत टाळेबंदी उशिरा लागू केल्याने तेथे जास्त बळी गेले. भारतात साठ वर्षांवरील लोकांना जास्त धोका आहे. भारतातील पन्नास टक्के मृत्यू हे साठीवरील व्यक्तींचे आहेत. भारतात साठीवरील लोकांची संख्या ९.९ टक्के , अमेरिकेत २२.४ टक्के, ब्रिटनमध्ये २४.१ टक्के ,तर इटलीत २९.४ टक्के आहे. टाळेबंदीमुळे वृद्ध लोक, मधुमेहासारखे आजार असलेले लोक यांचे मृत्यू कमी होण्यास मदत झाली असे मूर्ती यांनी म्हटले आहे.