चार नोव्हेंबर नंतरही इराणकडून तेल आयात सुरु ठेवण्याच्या आणि रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम विकत घेण्याचा निर्णयांचा भारताला काहीही फायदा होणार नाही. आम्ही भारताच्या या दोन्ही निर्णयांचा फार काळजीपूर्वक आढावा घेत आहोत असे अमेरिकेने म्हटले आहे. भारताचे हे दोन्ही निर्णय ट्रम्प प्रशासनाच्या धोरणाच्या विरोधात जाणारे असल्यामुळे अमेरिका भारतावर नाराज होण्याची दाट शक्यता आहे.

अमेरिकेने अद्याप भारताविरोधात ठोस भूमिका घेतली नसली तरी सूचक इशारे मात्र दिले आहेत. व्हाईटहाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी भारतावर काय कारवाई होते ते तुम्ही लवकरच पहाल असे सांगितले होते. त्यामुळे भारतावर अमेरिकेकडून निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेने मे महिन्यात इराण बरोबरच्या करारातून माघार घेतल्यानंतर सर्व मित्र देशांना ४ नोव्हेंबरपर्यंत इराणकडून तेल आयात पूर्णपणे थांबवण्यास सांगितले आहे.

भारत ४ नोव्हेंबर नंतरही इराणकडून तेल आयात चालू ठेवणार आहे या पत्रकारांच्या प्रश्नावर हा निर्णय भारताच्या फायद्याचा नाही असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नॉरेट म्हणाल्या. सध्या आंतरराष्ट्रीय तेल बाजारात इंधनाच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यस्थेवर होत आहे. अशा परिस्थिती इराणकडून तेल आयात थांबवली तर भारताला आणखी फटका बसेल.

दोन सरकारी तेल कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यात इराणकडून तेल आयातीच्या ऑर्डर दिल्या आहेत असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाबरोबर केलेल्या कराराबद्दल भारतावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मागच्या आठवडयात भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये एस-४०० करार झाला.

अमेरिकेने सीएएटीएसए कायद्यातंर्गत रशियाकडून शस्त्रास्त्र विकत घेण्यावर बंदी घातली आहे. मागच्या वर्षी अमेरिकन काँग्रेसमध्ये हा कायदा मंजूर झाला. फक्त अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सीएएटीएसए कायद्यातून एखादा देशाला सवलत देऊ शकतात. काल व्हाईटहाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी लवकरच भारतावर काय कारवाई होते ते तुम्ही लवकरच पहाल असे सांगितले.