पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावाचा परिणाम आज आंतरराष्ट्रीय न्यायालयातही दिसून आला. कुलभूषण जाधव यांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी दोन्ही देशांचे अधिकारी हेग येथील न्यायालयात समोरासमोर आल्यानंतर ही घटना घडली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव दीपक मित्तल यांनी आपल्या कृतीतून पाकिस्तानी अधिकाऱ्यांना भारतात नेमकी सध्या काय भावना आहे ते दाखवून दिले.

पाकिस्तानी अटॉर्नी जनरल अन्वर मन्सूर खान यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला पण दीपक मित्तल यांनी ‘हात मिळवला’ नाही. अन्वर मन्सूर खान यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला त्यावेळी दीपक मित्तल यांनी नमस्कार केला. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात भारताच्यावतीने ज्येष्ठ वकिल हरिश साळवे यांनी हेग येथील आंतरराष्ट्रीय कोर्टात सोमवारी जोरदार युक्तीवाद केला.

पाकिस्तानच्या वर्तनावरुन जाधव यांना पाकिस्तानात न्याय मिळेल असा विश्वास वाटत नाही. भारताविरोधात कथा रचण्यासाठी पाकिस्तानने जाधव यांचा उपयोग केला असा आरोप हरिश साळवे यांनी केला. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना वकिल दिल्याशिवाय त्यांना आपल्या ताब्यात ठेवले आहे. कुलभूषण जाधव यांच्या खटल्याच्या सुनावणीत कोर्टाचे नियम, प्रक्रिया यांचे पालन झालेले नाही. त्यामुळे पाकिस्तानात झालेली सुनावणी बेकायदा जाहीर करावी अशी मागणी हरिश साळवे यांनी केली.