News Flash

नोटाबंदी, कठोर नियमांमुळे सोन्याची झळाळी उतरली; मागणीत मोठी घट

वर्षभरात सोन्याच्या मागणीत २१ टक्क्यांची घट

सोन्याच्या मागणीत मोठी घट

मागील वर्षात देशातील सोन्याची मागणी तब्बल २१ टक्क्यांची घट झाली आहे. सराफांचा संप, व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक असणे आणि नोटाबंदीचा निर्णय यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी घट झाल्याचे वर्ल्ड गोल्ड काऊंसिलने म्हटले आहे. २०१५ मध्ये भारतात ८५७.२ टन सोन्याची विक्री झाली होती. मात्र मागील वर्षी म्हणजेच २०१६ मध्ये देशभरात ६७५.५ टन सोन्याची विक्री झाली आहे.

मागील वर्षी भारतात सोने खरेदीच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. ‘२०१६ मध्ये सोन्याच्या दागिन्यांना असलेली मागणी २१ टक्क्यांनी घटली आहे. २०१५ मध्ये सोन्याची मागणी ६६२.३ टन इतकी होती. गेल्या वर्षी ही मागणी ५१४ टनांवर घसरली आहे. व्हॅल्यू टर्मचा विचार केल्यास सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत १२.३ टक्क्यांची घट झाली आहे. २०१६ मध्ये सोन्याची व्हॅल्यू टर्म १,३८,८७८.८ कोटी इतकी नोंदवण्यात आली. तर २०१५ मध्ये सोन्याची व्हॅल्यू टर्म १,५८,३१०.४ कोटी इतकी होती,’ असे वर्ल्ड गोल्ड काऊंसिलने म्हटले आहे.

‘२०१६ मध्ये सोन्याच्या मागणीत वेगाने घट झाली आहे. चौथ्या तिमाहीत दरांमध्ये घट झाल्याने आणि दिवाळी असल्याने सोन्याच्या मागणीत ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. सराफा व्यवसायासमोर अनेक संकटे आल्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे. पॅन कार्डचे नियम, सोन्यावरील अबकारी शुल्क, नोटाबंदी यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे,’ अशी माहिती वर्ल्ड गोल्ड काऊंसिलचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमासुंदरम पीआर यांनी दिली आहे.

सरकारने सोने खरेदीसाठी पॅन कार्डचा वापर आवश्यक केल्याने येत्या काळात व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असे आर्थिक विश्लेषकांकडून सांगण्यात आले आहे. अर्थव्यवस्थेला फायदा झाल्यास त्याचा लाभ सराफा व्यावसायिकांदेखील होईल. सोने खरेदीला नोटाबंदीचादेखील मोठा फटका बसला आहे. शहरी भागात लोकांनी डिजिटल पर्यायांचा वापर करत सोने खरेदी केली आहे. मात्र ग्रामीण भागात चलन टंचाईमुळे सोने खरेदीच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 4:37 pm

Web Title: indias demand for gold decline sharply by 21 percent to 676 ton in 2016
Next Stories
1 E Ahameds Death: ई अहमद यांच्या मृत्यूची चौकशी करा, संसदेत विरोधकांची मागणी
2 एक्स्प्रेस गाड्यांमध्ये टीसीला प्रवाशांची झोपमोड करता येणार नाही!
3 रेल्वे रुळाला तडा दिसताच गँगमन ४५० मीटर धावला, एक्स्प्रेस थांबवली
Just Now!
X