तिसऱ्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था मंदावल्याचे चित्र आहे. सरकारने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. या आकडेवारीनुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१८ या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत केवळ ६.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यापूर्वीच्या दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारीपेक्षा ही आकडेवारी कमी आहे. यामुळे अर्थव्यवस्थेची २०१८-१९ ची अंदाजित वाढ ७ टक्के वर्तवण्यात आली आहे. यापूर्वी ही अंदाजित वाढ ७.२ टक्के होती.

सध्याच्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत राष्ट्रीय सकल उत्पन्न ६.६ टक्के इतके राहिले आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी हा डेटा जाहीर केला. या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत ही वाढ ८ टक्के इतकी होती. त्यानंतर दुसऱ्या तिमाहीत ती ७ टक्के राहिली. त्यानंतर ती तिसऱ्या तिमाहीत आणखी खाली जात ६.६ टक्क्यांवर पोहोचली.