भारतीय अर्थव्यवस्था महासंकटा आहे नरेंद्र मोदी सरकारने ही अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आणण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. यासाठी त्यांनी नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केलेल्या वक्तव्याचा हवाला दिला आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी गुरुवारी एक वक्तव्य केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचा ७० वर्षांमधील सर्वात कठीण काळ सुरु आहे असं म्हटलं होतं. त्याच वक्तव्याचा हवाला देत आता राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात आहे हे आता सत्तेत असलेल्या मोदी सरकारचे सल्लागार असलेलेच लोक सांगत आहेत. ज्या लोकांना खरोखर गरज आहे त्यांच्या हातून तुम्ही पैसा हिसकावलात तर काय होणार? अर्थव्यवस्था ढासळणारच ना? मोदी सरकारने ज्या लोकांची लूट केली आहे त्यांना त्यांचे पैसे परत करावेत अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

आजच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत सुस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तसेच अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असेही म्हटले आहे. अशात आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. आता केंद्राकडून राहुल गांधी यांना काही उत्तर दिले जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.