स्वतंत्र भारतामधील पहिले मतदार असलेले शाम शरण नेगी हे यंदा आपल्या आयुष्यातील १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये यंदाच्या निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या १०० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या १ हजार ०११ मतदारांपैकी नेगी एक आहेत. हिमालच प्रदेश निवडणूक आयोगाने तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील शंभरी ओलांडलेल्या मतदारांच्या नावाची यादी आदर्श मतदार म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत स्वतंत्र झाल्यापासून नेगींनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यंदाही ते हिमाचलमध्ये १९ मे ला मतदान करणार आहेत. १९५१ साली ऑक्टोबर महिन्यात भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणारे नेगी हे पाहिले भारतीय नागरिक ठरले. १०१ वर्षाचे असणारे नेगी येत्या १ एप्रिल रोजी १०२ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. नेगी हे निवृत्त शिक्षक असून ते किन्नूरमधील कलपा शहरामध्ये राहतात. सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे यासाठी नेगी आग्रही आहेत.

‘द क्विंट’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नेगी म्हणतात, ‘चांगला नेता निवडूण आणण्यासाठी मतदान करायला हवे. २०१७ साली विधानसभा निवडणुकांच्या वेळी मी मोदीच्या पक्षातील उमेदवाराला मत दिले होते. चांगले नेते निवडूण आले तर प्रगती होईल गरिबी नष्ट करण्यास मदत होईल.’

हिमाचलमध्ये एकूण ५१ लाख मतदार आहेत. त्यापैकी ४४ टक्के मतदार हे ४० किंवा त्याहून कमी वयोमान असलेले आहेत. वेगवेगळ्या जागी असणारी मतदार केंद्रे आणि भौगोलिक परिस्थितीमुळे राज्यातील वयस्कर मतदार मतदानाकडे पाठ फिरवताना दिसतात. म्हणूनच राज्याची सरासरी मतदानाची टक्केवारी ही शेजारच्या राज्यांपेक्षा कायमच कमी असते. २०१४ साली हरियाणामध्ये ७१.५ टक्के मतदान झाले तर पंजाबमध्ये ७०.६ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी हिमाचलमधील मतदानाची टक्केवारी ६४.४ टक्के इतकी होती.

१०० किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या मतदारांची हिमाचलमधील संख्या १ हजार ११ इतकी आहे. त्यापैकी ३० टक्के म्हणजेच २९८ मतदार हे कांगरा येथील रहिवासी आहेत. त्याखालोखाल हमीरपूर येथे १२५, मंडी १२२ आणि उना येते १०३ मतदारांचे वय १०० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. या शिवाय दुहेरी आकड्यांमध्ये शंभरीहून अधिक वयाचे मतदार असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत बिलासपूर (८५), शिमला (७५), चंबा (७३), श्रीमूर (५३), सोलान (४१), कुलू (२५) आणि किन्नूर (६) या जिल्ह्यांचा समावेश होतो. राज्यातील सर्वात दूर्गम भाग असणाऱ्या लाहूल खोऱ्यामध्ये १०० हून अधिक वय असणारे ५ मतदार आहेत.