लवकरच देशातील पहिली वॉटर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. सर्वकाही नियोजित राहिल्यास केरळमधील कोची शहरात नोव्हेंबर 2020 मध्ये ‘वॉटर मेट्रो’ सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ही देशातील पहिली ‘वॉटर मेट्रो’ ठरेल. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून पर्यावरण विषयक मंजुरी देखील मिळाली आहे. ही वॉटर मेट्रो 15 मार्गांवर चालेल आणि याद्वारे कोचीच्या आजुबाजूला असलेल्या 10 बेटांशी संपर्क होऊ शकेल. 78 किमीचा प्रवास ही वॉटर मेट्रो करेल.

‘कोची मेट्रो रेल लिमिटेड’कडे(केएमआरएल) या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी असून यामुळे बेटांवरील एक लाखांहून अधिक नागरिकांना फायदा होईल. “नोव्हेंबर 2020 पर्यंत जास्तीत जास्त टर्मिनल पूर्ण करण्याची आमची योजना आहे. कोचीन शिपयार्डने नोव्हेंबर 2020 पर्यंत वॉटर मेट्रोची पहिली बोट सोपविण्याची तयारी दर्शविली आहे. एकदा हा वॉटर मेट्रोचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट जलवाहतूक प्रकल्प ठरेल, असं केएमआरएलचे व्यवस्थापकीय संचालक अलकेश कुमार शर्मा म्हणालेत.

वॉटर मेट्रोद्वारे कोचीच्या आजुबाजूला असलेल्या 10 द्वीपांवरील 38 टर्मिनलशी संपर्क होऊ शकेल. यातील 18 टर्मिनल हे मुख्य बोट हबच्या रूपात तयार करण्यात आले आहेत. 819 कोटी रूपयांच्या या प्रकल्पाच्या 78 किमी मार्गावर दोन बोटयार्ड असतील. मेट्रोसाठी 78 इको-फ्रेंडली, वेगवान आणि एअर कंडिशन बोटी तयार करण्यात आल्यात. जर्मनीच्या ‘केएफडब्ल्यू’ बँकेकडून या प्रकल्पासाठी आर्थिक मदत होत आहे.